महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्राच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम.. विकृत सरकारी कर्मचाऱ्याचा पोलीस मित्रावर गोळीबार - मित्र

जखमी पोलीस आणि आरोपी हे दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील एकाच परिसरातील असल्याने पूर्वीपासून मित्र आहेत. विशेष म्हणजे कशेळी या भागात राहण्यास असल्याने दोघांचे कौटुंबिक संबंध होते. त्यातूनच आरोपीचे मित्राच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम जडले. यावरून दोघामध्ये वादही झाला होता.

जखमी पोलीस नितीन सपकाळ

By

Published : Apr 5, 2019, 8:15 AM IST

Updated : Apr 5, 2019, 8:26 AM IST

ठाणे- पोलीस मित्राच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकृत शासकीय कर्मचाऱ्याने देशी बनावटीच्या रिव्हॉल्वरने पोलीस मित्रावरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे दोघांच्या झटापटीत गोळीचा नेम चुकल्याने त्याच रिव्हॉल्वरच्या लोखंडी दस्त्याने डोक्यावर प्रहार केल्याने त्यात पोलीस मित्र जखमी झाला आहे. ही घटना कशेळी गावातील एका इमारतीत घडली आहे.

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून पोलीस मित्रावर गोळीबार

नितीन सपकाळे (वय ४०) असे जखमी पोलिसाचे नाव असून ते ठाणे शहरातील वाघाविळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर चंद्रकांत बाविस्कर (वय ३६) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला शेजा-यांच्या मदतीने पकडून नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

शासकीय सेवेत वांद्रे येथील कार्यालयात मराठी अनुवादक म्हणून आरोपी चंद्रकांत कार्यरत आहे. जखमी पोलीस नितीन आणि आरोपी चंद्रकांत हे दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील एकाच परिसरातील असल्याने पूर्वीपासून मित्र आहेत. विशेष म्हणजे कशेळी या भागात राहण्यास असल्याने दोघांचे कौटुंबिक संबंध होते. त्यातूनच आरोपी चंद्रकांत याचे मित्र नितीन याच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम जडले. यावरून दोघामध्ये वादही झाला होता.

त्याच वादातून गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कशेळी येथील श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात नितीन सपकाळे हे पत्नीसह बसले असतानाच त्याठिकाणी आरोपी चंद्रकांत येऊन त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला, की आरोपी चंद्रकांतने आपल्याकडील देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरने २ गोळ्या नितीनच्या दिशेने झाडल्या. मात्र, ती चुकविल्याने समोरील भिंतीत गोळी घुसली. दरम्यान, गोळीबाराच्या आवाजाने शेजारील धावून येत त्यांनी आरोपी चंद्रकांतला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्याने रिव्हॉल्वरचा लोखंडी दस्ता नितीनच्या डोक्यात जोरदार मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी नितीनला तत्काळ काल्हेर येथील एस. एस. रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. दरम्यान, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी घटनास्थळी पोलीस पथकासह धाव घेत आरोपीला देशी बनावटीच्या रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Apr 5, 2019, 8:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details