ठाणे -राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची सुरुवात झाली. त्यामध्ये १३४-भिवंडी ग्रामीण, १३६-भिवंडी पश्चिम, १३७-भिवंडी पूर्व या तिन्ही मतदार संघात दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी दिवे-अंजूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. तर शहरात महापौर जावेद दळवी यांनी नारळी तलाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पडघा येथे मतदान केले. ठाणे जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी सपत्नीक गुंदवली येथे मतदान केंद्रात मतदान केले. विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांनी भादवड येथे तर आमदार महेश चौघुले यांनी गौरीपाडा तर आमदार शांताराम मोरे यांनी खानिवली येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी खासदार कपिल पाटील व आमदार रुपेश म्हात्रे, आ. महेश चौघुले, आ. शांताराम मोरे यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा हक्क बजवावे, असे आवाहन केले.