ठाणे - भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शहरात आतापर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या पोलिसांची नाकाबंदी दिखाव्याची ठरल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील दहिसर पूर्व येथे महिला एक महिना माहेरी वास्तव्य करून 15 एप्रिलला भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला येथे सासरी आपल्या दोन मुलांसोबत परतली. याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागास मिळताच, या तिघांचे विलगीकरण करून त्यांचे 'स्वॅब' नमुने तपासणीसाठी हाफकीन इन्स्टिट्यूट या ठिकाणी पाठविले. यात 30 वर्षीय महिला, तिचा 12 वर्षाचा मुलगा व 2 वर्षाची मुलगी या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या अतिनिकट संपर्कातील 7 जणांना टाटा आमंत्रण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.
या तिघांव्यतिरिक्त वडाळा येथील महिला आपल्या तीन मुलांना घेऊन भिवंडी शहरातील गुलजारनगर येथे माहेरी 19 एप्रिलला आली होती. त्यांचेही विलगीकरण केल्यावर त्यापैकी 7 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिच्या अतिनिकट संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींनासुध्दा टाटा आमंत्रण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.