ठाणे :ऐतिहासिक रेल्वेस्थानक म्हणून ठाणे स्थानकाचा गौरव होतो. देशभरातील प्रमुख स्थानकाच्या तुलनेत ठाणे स्थानक नगण्य दिसत होते. त्यामुळे स्थानकाचा इतिहास सर्वाना कळावा यासाठी येथे एखादे स्मारक बनवण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकून तब्बल 100 वर्ष जुने ब्रिटिश कालीन वाफेच इंजिन ठाणे स्थानकातील प्लँटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर ठेवले आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट झाली आहे.
ठाणेकरांची साद, रेल्वेचा प्रतिसाद
भारतात १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे वाडीबंदर ते ठाणे स्थांनकादरम्यान धावली होती. त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचा विस्तार वाढत गेला. मात्र, ठाणे स्थानकाकडे कोणी गांभीर्याने बघीतले नाही. त्यातच ठाणे शहराचा हळूहळू चेहरामोहरा बदलत गेला. मात्र, ठाणे स्थानकात रेल्वेच्या जुन्या कोणत्याच पाऊलखुणा नव्हत्या. गेल्यावर्षी ठाणे पूर्वेतील विसर्जन घाट रस्त्यावर खोदकाम करताना जुने रूळ दिसून आले. त्याचवेळी ठाणेकरांनी हे रूळ काढून ब्रिटिश कालीन रेल्वे इंजिन आणि दोन डबे आणून स्मारक करावे, अशी मागणी केली होती. या मागणीचा रेल्वेने सकारात्मक विचार केला. त्यानुसार, प्लँटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर ऐतिहासिक जुने इंजिन लावले आहे. लवकरच रेल्वेचा सर्व इतिहास ठाणेकरांना बघायला मिळणार आहे.