ठाणे -अंबरनाथ शहरातील वीज ग्राहकांना एमएससीबीने पुन्हा तिपटीने वीजबिल पाठवले आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शहराच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले. शिवाय काही नागरिकांनी एमएससीबीच्या कार्यालयाच्या आवारात घरातील टीव्ही फोडून वाढीव वीज बिलाचा निषेध केला.
वीजबिल तिपटीने आल्याच्या निषेधार्थ मनसेचे अंबरनाथमध्ये 'भीक मांगो' आंदोलन - मनसेचे अंबरनाथमध्ये 'भीक मांगो' आंदोलन
अंबरनाथ शहरातील वीज ग्राहकांना एमएससीबीने पुन्हा तिपटीने विजबिल पाठवले आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ शहराच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घरीच होते. त्यातच काहींच्या नोकऱ्या ही गेल्या तसेच उद्योग व्यवसायही बंद अशा परिस्थितीमध्ये एमएससीबीने लॉकडाऊनमध्ये ग्राहकांचे रीडिंग घेणे बंद केले. त्यानंतर एप्रिल, मे, जून महिन्यात वीजबिले ही जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या वीज बिलाच्या आधारे सरासरी घेऊन वीज ग्राहकांना पाठवली. काही विज ग्राहकांनी ती वीज बिले भरलीसुद्धा. परंतु. आता जुलै महिन्यात मिटर रिडींग घेतल्यानंतरही नागरिकांनी सरासरी बिले भरून पुन्हा एमएससीबीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली. विशेष म्हणजे ज्या नागरिकांना महिन्याचे पंधराशे ते दोन हजार वीज बिल येत होती, त्याच ग्राहकाला जुलै महिन्यात 12 ते 15 हजार रुपये वीज बिल पाठवण्यात आले आहे. त्यातच लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना तर वेळेवर पगार नाही मग, ही वीजबिल भरणार कशी याचा विचार सरकारने करायला पाहिजे असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
दरम्यान, राज्य सरकाराने वीजग्राहकांच्या मागणीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आलेली वीज बिले माफ करावे. अन्यथा यापुढे मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. जोपर्यंत अव्वाच्या सव्वा आलेल्या वीज बिलावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत नागरिकांनी बिले भरू नका. जर कोणी कर्मचारी तुमचा वीज पुरवठा खंडित करायला आले तर मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगा तिथेच त्या कर्मचाऱ्याला मनसे धडा शिकवेल असे आव्हानही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.