ठाणे - शहरात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू, असे जाहीर केले आहे. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
ठाण्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये रंगली होळी; लोकसभा निवडणुकीत एकच रंग असल्याचे संकेत - मनसे आणि राष्ट्रवादी
ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या.
रंगपंचमीच्या निमित्ताने ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनीच आहे. मात्र, यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विचारे आणि परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक शिवसेनेला काही प्रमाणात कठीण जाणार असल्याचे चिन्हे आहेत.