ठाणे- विधानसभेच्या निकालानंतर ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. या दोन्ही महापालिकेत राष्ट्रवादी आणि मनसेची नवी युती उदयास येण्याची चिन्हे आहेत. तसे संकेतही या दोन्ही पक्षांनी निवडणुकीमध्येही आणि निकालानंतरही दिले आहेत.
हेही वाचा -पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई
2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहर मतदारसंघातून मनसेला केवळ ८ हजार ३७२ मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ७२ हजारांपर्यंत मते घेणाऱ्या मनसेने भाजपचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटवले असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीण मतदारसंघातही संपूर्ण राज्यात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ९३ हजार ८१८ मतांनी निवडून आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मनसेची ताकद यानिमित्ताने वाढली असून दोन्ही महापालिकेत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचे मनसुबे राष्ट्रवादी आणि मनसेने आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे. तर याबाबत दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -बदलापूर-रमेशवाडी मार्गावर डंपर-दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार
राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून शरद पवार यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे राष्ट्रवादी पक्षाला चांगलीच उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर विधानसभा आणि कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघाचे निकाल देखील सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारे आहेत. महायुतीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिवसेनेने दावा करूनही भाजपने तो आपल्याकडे घेतल्याने ती नाराजी काही प्रमाणात शिवसैनिकांमध्ये होतीच. या मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. तशाप्रकारची तयारी देखील काही काँग्रेसच्या मंडळींनी केली होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीच्यावतीने सुहास देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी राजकीय खेळी करत सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर करत मनसेच्या अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन तेव्हाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची राजकीय गणिते मनसे आणि राष्ट्रवादीकडून आखायला सुरुवात झाली होती.