ठाणे - रस्त्यावरील फुटपाथ व्यापलेल्या आंब्याच्या स्टॉलवरून गुरुवारी भाजप आणि मनसेत राडा झाला होता. त्यानंतर परवानगी दिलेल्या आंबा स्टॉलवर आयुक्तांनी कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिल्याची पालिका सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान, आता याविरोधात १७ मे ला मनसे आंबा विक्रेते आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढणार असून या मोर्चाला राज ठाकरेदेखील उपस्थित राहू शकतात.
नौपाड्यातील नागरिकांच्या तक्रारीनुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला बेकायदेशीर स्टॉल हटवावे, असे निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू होती. यावेळी कारवाई दरम्यान मनसैनिकांनी आंब्याच्या स्टॉलला हात लावू नका, असे अतिक्रमण विभागाला सांगितले. दरम्यान, शहराच्या वातावरणाच्या दृष्टीने फुटपाथवर स्टॉल उभारणे योग्य नसल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे पालिका अतिक्रमण विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार कारवाई दरम्यान आंब्याच्या स्टॉलवरून भाजप आणि मनसेत राडा झाला. फुटपाथवरून स्टॉल काढावा असा भाजपचा तर मराठी माणसाचा स्टॉल हलवणार नाही, असा मनसेचा सूर होता. सुरात सूर बेसूर झाल्याने वाद विकोपाला गेला. त्यानंतर नौपाडा पोलीस आले. पण कुणीच ऐकण्यास तयार नव्हते. मनसेने आंबा स्टॉलला अस्तित्वाचा मुद्दा केला. तर भाजपने ठाणेकरांचा फुटपाथ मोकळा करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात भिडत झाली आणि पोलिसांना कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला.
शुक्रवारी पुन्हा हा स्टॉल परवानगी घेऊन उभारण्यात आला. मनसेने फटाक्याची आतषबाजी घटनास्थळी करून जल्लोष केला. तर भाजपने पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या गुंडशाहीचा, दादागिरी करणाऱ्या मनसेचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, परवानगी दिलेल्या आंबा स्टॉलवर आयुक्तांनी कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिल्याची पालिका सूत्रांनी माहिती दिली. आता याविरोधात १७ मे ला मनसे आंबा विक्रेते आणि आंबा शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढणार असून या मोर्चाला राज ठाकरेदेखील उपस्थित राहू शकतात.