ठाणे - कोरोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीची किंमत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड असणाऱ्या कष्टकरी बांधवाना मोजावी लागत आहे. आजही हजारो कामगार रस्त्याच्या कडेने वेदनने व्हिव्हळत निघाले आहेत. आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील आहोत पण आभाळ फाटलंय ठिगळं लावायची तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ते दृश्य पाहून 'वेदनेला अंत नाही त्याचीच कुणाला खंतही नाही' अशी परिस्थिती कष्टकरी बांधवांवर कोरोनामुळे येऊन ठेपल्याची व्यथा श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी आपबितीतून मांडली आहे.
भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने भुकेल्या कष्टकऱ्यांसाठी माणुकीची थाळी सुरु केली आहे. काल रात्रीच्या सुमारास माणुकीची थाळी संपल्यावर पवार यांचे काही सहकारी कार्यालयामध्ये झोपण्यासाठी गेले. तर रात्रीचे साडे अकरा वाजता जयेश आपल्या घरी अकलोली येथे जायला निघाला असता भिवंडी-वाडा रस्त्यावरील सैतानी पुलाजवळ 150 ते 165 मजूर आणि एक महिला तिच्या कडेवर लहान बाळ घेऊन आंबडीकडे येताना त्याने पाहिले. या मजुरांना काहीतरी खायला देता येईल का? हा विचार करून जयेश पुन्हा कार्यालयात आला. मात्र, दुर्दैवाने जेवण संपले होते. शिवाय दोन्ही गॅसचे सिलेंडर संपलेले होते. त्यामुळे उपलब्ध असलेले फरसाण, बिस्किट्स, पाणी आणि डॉ. विनय पाटील यांनी दिलेली रेडी टू कुक खिचडी पॅकेट्स घेऊन प्रमोद पवार, जयेश, साई आणि नावनाथ त्या मजुरांकडे निघाले. तोपर्यंत ते मजूर सावरोली गावापर्यंत पोहोचले होते.
यामध्ये एक महिला आणि त्यांची 3 वर्षाची चिमुरडी देखील पायी प्रवासात आईच्या कडेवर बसून पार गळून गेलेली होती. त्यावेळी त्यांनाजवळ असलेले साहित्य व पाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. त्यांना रस्त्यालगत असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी साधारण एक किलोमीटर पुढे झोपण्याची व्यवस्था केली. यातील चिमुकलीचे कुटुंब उत्तर प्रदेशमधील जोनपूर, काही जण गोरखपूर व महाराज गंज तसेच मध्यप्रदेश मधील असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले.