महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून चुलतभांवासह काकाने केली पुतण्याची हत्या

मृत चिंतामण जाधव यांचा त्यांचा चुलत काका अनंत लिंबा जाधाव व त्यांची मुले अरुण व प्रकाश यांसोबत जमिनीचा वाद होता. त्यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद सुरू होता. त्यातून ही हत्या झाली आहे.

मृत चिंतामण विठ्ठल जाधव

By

Published : May 11, 2019, 9:13 PM IST

Updated : May 11, 2019, 9:42 PM IST

ठाणे-जमिनीच्या वादातून पुतण्यावर चुलत काका व दोघा चुलत भावांनी कुऱहाडीने डोक्यात घाव घालून निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील दुधनी या गावात घडली आहे. चिंतामण विठ्ठल जाधव (वय, ४५) असे निर्घुण हत्या झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर अनंत लिंबा जाधव (६०) व त्यांची मुले अरुण व प्रकाश यांच्यावर पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.

पोलीस ठाणे पडघा

मृत चिंतामण जाधव यांचा त्यांचा चुलत काका अनंत लिंबा जाधाव व त्यांची मुले अरुण व प्रकाश यांसोबत जमिनीचा वाद होता. त्यावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद सुरू होता. त्यातच शुक्रवारी रात्री मृत चिंतामण हे गावातील एका घरी लग्नसमारंभानिमित्त हळदी समारंभाला गेले होते. त्याठिकाणी चिंतामण आणि त्यांचा चुलत काका अनंत लिंबा जाधव व चुलत भाऊ अरुण जाधव व प्रकाश जाधव यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर चिंतामण जाधव हे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे जात असताना त्यांना रस्त्यातुन फरफटत खेचत आपल्या घराकडे घेऊन जात त्याठिकाणी कु-हाडीने चिंतामण यांच्या डोक्यात घाव घातले. त्यामध्ये चिंतामण रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याला घराबाहेर टाकून तिघांनी घरात घुसून आतून दरवाजा बंद केला.

या हत्येचा थरार घराबाहेर असलेल्या चिंतामण यांच्या मुलाने पाहिला. त्याने पित्याला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले पाहून कुटुंबियांना बोलावून घेतले व चिंतामण यांना अंबाडी येथे उपचारासाठी घेऊन गेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन आले. दरम्यान, या घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून चुलता व त्यांच्या मुलांवर हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Last Updated : May 11, 2019, 9:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details