ठाणे- बाहेरख्यालीपणाबद्दल जाब विचारल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला चामडी पट्याने मारहाण करून रिव्हॉल्वरच्या दस्त्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भान लच्छी चंद (३६) असे पतीचे नाव असून त्याला कासार वडवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर व दोन काडतुसे जप्त केली असून त्याने हे रिव्हॉल्वर कुठून आणले याचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपीला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रियांका भान चंद (३२) असे पीडित पत्नीचे नाव आहे. ठाण्यातील एका खाजगी कंपनीत सोबत काम करीत असलेल्या सेल्स ऑफिसर भान चंद (रा. उत्तराखंड) याच्याशी प्रियांकाचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर प्रियांकाने नोकरी सोडली. दरम्यान, चार ते पाच महिन्यापासून पती भान चंद याचे कंपनीत सोबत काम करीत असलेल्या एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे प्रियांकाला कळाले. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. या कौटुंबिक भांडणामुळे ५ जून रोजी प्रियांका आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मुंबईतील आई-वडिलांकडे राहावयास गेली.