ठाणे- महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते व पदपथ हे नागरिकांसाठी असून ते कायमस्वरुपी नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट आदेश वागळे इस्टेट विभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून झालेल्या बैठकीदरम्यान महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.
मागील काही महिन्यांपासून वागळे विभागात विशेषत: कामगार हॉसिपटल रोड/नाका, इंदिरानगर नाका, यशोधननगर, रोड नं. 22 व श्री आईमाता चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक व नगरसेवक यांनी महापौर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका आशा डोंगरे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे, वाहतूक विभाग, परिवहन विभाग, महावितरण तसेच महापालिकेचे अधिकारी व ज्ञानोदय विद्यालय व आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
हेही वाचा - मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे - सरदेसाई
स्वातंत्र्यवीर सावरकर नगर विभागामध्ये शाळा व महाविद्यालय असून या ठिकाणी दैनंदिन येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एकाच वेळी शाळा सुटत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच वसंतविहार, शास्त्रीनगर, येऊर, उपवन आदी विभागांतील वाहनधारक मुलुंडकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत असल्यामुळे दिवसभर येथे वाहतूक कोंडी होते. यासाठी एक मार्गी वाहतूक करणेबाबत कार्यवाही करावी असे आदेश या बैठकीत महापौरांनी दिले. तसेच या विभागामध्ये बहुतांश ठिकाणी हातगाड्या, फेरीवाले, गॅरेजवाले रस्ता तसेच पदपथावर बसत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. हे अतिक्रमण हटवण्याबाबत कठोर कारवाई करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. या परिसरात सुरू असलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यादृष्टीने कार्यवाही करून तुर्तास चौकातील खड्डे बुजविणे व ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच बहुतांशी रस्त्यांवर अनेक दिवसापासून अनधिकृतपणे मोठी वाहने उभी असतात. यावर कारवाई करावी, तसेच वर्षानुवर्षे एकाच जागेवर उभी असणाऱ्या भंगार वाहनांवर कायदेशीर कारवाई करुन ही जागा मोकळी करण्यात यावे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - दरोडेखोरांनी भर दिवसा घरातून लुटला १ कोटी ८६ लाखांचा ऐवज
तर वेदांत कॉम्प्लेक्स येथील खुला रंगमंच हा आठवडा बाजारासाठी देण्यात येवू नये, असेही आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले. वागळे विभागातील वाहतूक कोंडीसंदर्भात तातडीने दखल घेवून बैठकीचे आयोजन करून प्रशासनास सूचना दिल्याबद्दल सर्व उपस्थितांनी महापौरांचे आभार व्यक्त केले.
हेही वाचा - ट्रकने कट मारल्याने दुचाकीला अपघात.. पत्नी ठार, पती व मुलगा गंभीर