नवी मुंबई- येणारी एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाकडून केंद्र बंद पाडण्यात येतील, असा इशारा काल (बुधवार) संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली तसेच उदयनराजे भोसले यांच्यावरही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खालच्या पातळीची टीका केली होती. या टीकेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे समन्वयक नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले यावेळी आम्ही राजांविरोधात कसलीही टीका खपवून घेणार नसल्याचा इशारा उपस्थितांनी दिला.
राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाच्या माध्यमातून केली जात आहे. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 7 ऑक्टोबर) माथाडी भवनमध्ये या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 11 तारखेला जर एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या तर मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने परीक्षा केंद्र बंद पाडू, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. तसेच पुढील 2 दिवसांत सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा, अन्यथा पुढे काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते.