ठाणे -उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ धोबीघाट परिसरातील उंच टेकडीच्या लगतच असलेल्या घरांवर संततधार पावसाने टेकडीची दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ३ पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली असून, लगतच्या अनेक घरांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे. कोसळलेल्या दरडीमुळे अनेक घरांना धोका निर्माण झाला. या दुर्घटनेत आतापर्यत जीवितहानी झाली नसली तरी, मात्र अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. दरड कोसळल्याने टेकडीवरील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
- यापूर्वी कोसळली होती दरड -
उल्हासनगरमधील धोबी घाट परिसरात उंच टेकडी आहे. या टेकडीवर असंख्य घरे उभारण्यात आली असून जुलै महिन्यात अशीच दरड कोसळून अनेक घरांना तडे गेले होते. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी या टेकडीवरील अनेक घरांना नोटिसा बजावून घरे रिकामी करण्याचे सांगितले होते. बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पुन्हा दरड कोसळून ३ पेक्षा जास्त घरे दरडीखाली दबली.
हेही वाचा -पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग.. कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाह यांच्या भेटीला, भाजप प्रवेशाची शक्यता
- टेकडीला संरक्षण भिंत उभारण्याची मागणी -
भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख, मेनुद्दीन शेख आदींनी टेकडीला संरक्षण भिंत बांधून दुर्घटनाग्रस्त झालेल्या नागरिकांना पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता महेश शितलानी, शाखा अभियंता तरुण सेवकांनी यांनी यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा करून संरक्षण भिंत बांधण्याचे संकेत दिले.
- नागरिकांना पर्यायी घरे देण्याची मागणी -
स्थानिक नगरसेविका ज्योती गायकवाड, माजी नगरसेवक व शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, मनसेचे शहर संघटक मैनिद्दीन शेख आदींनी संरक्षण भिंतीसाठी कमीतकमी २५ लाखांचा निधी देण्याची मागणी महापालिकेकडे केली. घरे कोसळून बेघर झालेल्या नागरिकांना पर्यायी घरे देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा -न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी