ठाणे: जिल्ह्यात सर्व यंत्रणा सतर्क राहून मदत व बचाव कार्य करत आहेत. पावसामुळे झालेल्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आढावा घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील महसूल, जिल्हापरिषद व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 20 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा व भरतीची वेळ याचा विचार करून, उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले आहे.
परिस्थितीचा घेतला आढावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी शिनगारे व जिंदल यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, नगरपालिका व महानगरपालिकांचे अधिकारी तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला व सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
कुटुबांचे तातडीने केले स्थलांतर: जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पडलेला पाऊस, पावसामुळे बंद पडलेले रस्ते, पूल, नागरिकांचे स्थलांतर व त्यांची राहण्याची पर्यायी सोय आदींची माहिती त्यांनी प्रशासनाकडून घेतली. कालपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावातील बाधित कुटुबांचे तातडीने स्थलांतर करून त्यांच्या राहण्याच्या, जेवण्यांची पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. अंबरनाथ, बदलापूर रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतूक बाधित झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. तसेच नदी, नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन त्यावरून नेऊ नये, अथवा त्यावरून रस्ता ओलांडू नये. तसेच आकस्मिक संकट अथवा अडचण आल्यास, स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना शिनगारे यांनी दिल्या आहेत.