ठाणे - विकास सर्वांना हवा आहे. मात्र, तो विकास सर्वसामान्य शेतकऱ्यांना तसेच स्थानिक भूमिपुत्रांना पैशांचे अमिष दाखवून उद्ध्वस्त करून येथील तरुण बेरोजगार होणार असतील तर तो विकास आम्हाला नको, अशी ठाम भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील भोईरगांव, साईधारा येथील प्रवेशद्वारावर स्थानिक शेतकऱ्यांनी भर रस्त्यात ठाण मांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अनोख्या पद्धतीने सत्याग्रहाचा अवलंब करून जमीन मोजणी रोखून धरली. त्यामुळे येथे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जेएनपीटी ते बडोदरा द्रुतगती महामार्गाची जमीन मोजणी भूमिपुत्रांनी सत्याग्रह करून रोखली हेही वाचा-#HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..
मुंबई जेएनपीटी ते बडोदरा या दोन बंदरांना जोडणारा २०० किमी. लांबीचा विशेष महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून या महामार्गाकडे बघितले जाते. या रस्त्यात बाधित शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या भावना प्रशासन व शासनाने समजून घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता काही अधिकारी जाणूनबुजून स्थानिक भूमिपुत्रांना उध्वस्थ करण्यासाठी हा महामार्ग कुकसे, भोईरगांव येथील अकृषिक शेतीमध्ये बांधण्यात आलेल्या गोदामांमधून नेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे येथील सुमारे ६० लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधण्यात आलेल्या गोदामांचे निष्कासन होणार आहे. येथील गोदामे तोडली गेल्यास सुमारे दहा हजाराहून अधिक तरुणांवर बेरोजगाराची पाळी ओढवणार आहे. सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात श्रमजीवी संघटना स्थानिक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देत राहील, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर यांनी दिला आहे. या महामार्गासाठी केलेले सर्व्हेक्षण हे कार्यालयात बसून गुगल मॅपवरून करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती अधिकारी वर्गाने तपासली नसून या गोदाम भागालगत मोकळी व कमी नुकसान करणारी जागा उपलब्ध असताना या गोदाम पट्यावरच डोळा का ठेवला जात आहे, असा सवाल देखील बाळाराम भोईर यांनी उपस्थित केला आहे.
कुकसे, भोईरगाव या परिसरातील साईधारा व सुमित लॉजिस्टिक हे दोन गोदाम संकुल नावारूपाला आले. या ठिकाणी सुमारे ६० लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात गोदामांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र, या गोदाम पट्ट्यातूनच हा महामार्ग जात असल्याने स्थानिक भूमिपुत्रांचे उत्पन्नाचे साधन तसेच हजारो युवकांचा रोजगार, शेकडोंना मिळणारा पूरक व्यवसाय अशा हजारो कुटुंबीयांची वाताहत या महामार्गामुळे होणार आहे. त्यामुळे शाश्वत विकास ही संकल्पना राबविताना येथील शेतकरी, भूमिपुत्र यांना उद्ध्वस्त करून केला जाणारा विकास आम्हाला नको. आमच्याच पैशातून काही पैशांची लालूच शेतक-यांना दाखवून फसवणुकीचे धंदे आता शासकीय अधिकऱ्यांनी बंद करावेत, असा सज्जड दम श्रमजीवीचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिला आहे. तर या सत्याग्रह आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी या शेतकऱ्याच्या व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जरूर मांडल्या जातील. तर आमदार शांताराम मोरे यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात भिवंडी तालुक्यात सुरू असलेल्या कारवाई विरोधात आपण विधानमंडळात आवाज उठवू, असे आश्वासन स्थानिक सत्याग्रही शेतकऱ्यांना दिले.
भिवंडी तालुक्यातील भोईरगाव येथील साईधारा या वेअरहाऊस कॅम्पसची जेएनपीटी-बडोदरा द्रुतगती महामार्गासाठी मोजणी होती. मात्र, या कॅम्पसमधून रस्ता गेला तर येथील चालू स्थितीत असलेले व्यवसाय उद्ध्वस्त होतील. तब्बल सहा हजार कुटुंब रस्त्यावर येणार आहेत. यासाठी मोजणी करून संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार, तालुका भूमापन अधिकारी, तहसीलदार प्रतिनिधी आदींचे पथक या ठिकाणी उपस्थित झाले. श्रमजीवी संघटनेने याच ठिकाणी रस्त्यामध्ये सत्याग्रह केला. व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सत्याग्रह आंदोलन केले. श्रमजीवी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जमीन मोजणी अधिकाऱ्यांनी अखेर जमीन मोजणी थांबवत असल्याचे घोषित केले.
त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी एकच जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला. स्थानिक कामगारांना बेरोजगार करणाऱ्या महामार्गास आमचा विरोध असून यासाठी पर्यायी मार्ग निवडावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली आहे. संघटनेच्या या संघर्ष आणि सत्याग्रहानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचए) चे अधिकारी आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी आपला गाशा गुंडाळत मोजणी न करताच काढता पाय घेतला. प्राधिकरण अधिकारी शिवाजीराव पवार यांनी आंदोलकांना मोजणी करून देण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांचा प्रखर विरोध पाहून त्यांनी काढता पाय घेतला. या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना आमदार शांताराम मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील, श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोळेकर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विष्णू चंदे, केशव पारधी, जया पारधी, आरपीआय सेक्युलरचे सरचिटणीस अॅड. किरण चन्ने, आदी मान्यवरांसह शेकडो स्त्री, पुरुष सहभागी झाले होते.