ठाणे- पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेशी वर्षभरापासून प्रेम संबंध जोडून शारीरिक भूक भागवणाऱ्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. यावरून संतापलेल्या प्रेयसीने धारदार विळ्याने प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून छाटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील केजीएन चौक, नवी वस्ती परिसरात घडली आहे. फकरू रेहमान खान ( वय ३० वर्षे, रा.नविवस्ती, केजीएन चौक, भिवंडी) असे प्रेयसीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
लग्नास नकार देणार्या प्रियकराचे प्रेयसीकडून गुप्तांग छाटण्याचा प्रयत्न; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल - प्रेम
पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेशी वर्षभरापासून प्रेम संबंध ठेवून लग्नान नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या प्रेयसीने धारदार विळ्याने प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून छाटण्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.
जखमी प्रियकर फकरू याचे गेल्या वर्षभरापासून शेजारी राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध जुळल्यामुळे ती फकरू यास अधूनमधून तिच्याकडे रात्री बोलावत होती. शनिवारीही तिने त्याला घरात बोलावले होते. यावेळी त्या महिलेने त्याच्याकडे लग्नाची विचारणा केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला होता. त्यामुळे फकरू हा फक्त आपला शरीरसंबंधासाठी वापर करत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार वादही झाला होता. या वादातूनच या महिलेने काळोखात त्याचे गुप्तांगावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये जखमी अवस्थेतील रक्तबंबाळ झालेल्या फकरू याला शेजारच्या नागरिकांनी तत्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून या हल्ल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोर महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तर गेल्या वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून उपभोग घेणाऱ्या फकरू याच्याविरोधात देखील बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक देवा पाटील करत आहेत.