ठाणे- शहरात काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तर काही भागात अजूनही निर्बंध कायम आहेत. कोपरी-नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने या हद्दीमधील दुकाने उघडण्याचे नियोजन कशा पद्धतीने करायचे, याची धावपळ आता ऐनवेळी प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
यासाठी प्रभाग समितीमधील महत्वाच्या स्टाफची बैठक देखील आज तातडीने बोलवण्यात आली असून या प्रभाग समितीच्या हद्दीतील आस्थापनांची माहिती देखील मागवण्यात आली आहे. जे कर्मचारी या बैठकीला उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. विशेष करून वागळे, लोकमान्य नगर आणि कोपरीमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने या ठिकाणी प्रशासनाच्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
आता केंद्राच्या निर्देशाप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असल्याने याबाबत आधीच केंद्र सरकारच्यावतीने संकेत देण्यात आले होते. मात्र ठाणे महापालिकेने मात्र अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नौपाडा -कोपरी प्रभाग समितीने यासंदर्भात एक तातडीची बैठक आज प्रभाग समिती कार्यालयात बोलावली असून काही महत्वाच्या कर्मचाऱ्यांना लेखी नोटीस देखील देण्यात आल्याचे समजते. या लेखी नोटिसीमध्ये पालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढले असून यामध्ये सर्व प्रकारची दुकाने (सलून, स्पा, बार्बर शॉप ) वगळून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे यामध्ये नमूद केले आहे.
दुकाने उघडण्यासाठी कोपरी-नौपाडा प्रभाग समितीचे ऐनवेळी नियोजन नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांची माहिती एका दिवसांत संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या एका दिवसांत सर्व प्रकारची माहिती संकलित करणे कठीण आहे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.