नवी मुंबई - कोकण विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराबाबत शासकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून जनतेने आवश्यक काळजी घेऊन स्वत:चे आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौड यांनी केले आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून कोकणातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या बैठका घेऊन त्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे दौंड यांनी सांगितले.
कोकण विभागातील मुंबई शहर, उपनगरासह पाचही जिल्ह्यात तपासणी पथके, स्कॅनिंगची सोय करण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड यांच्या मदतीने बाहेरहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 87 हजार प्रवाशांची स्कॅनिंग करण्यात आल्याचे दौंड यांनी सांगितले. कोकणातील जनतेने होळी उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे. सर्व सामान्य जनतेला मास्क घालण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औषध विक्री करणाऱ्यांकडून पी.पी.इ.किट्स आणि एन-95 या मास्कची मुळ किंमती पेक्षा जास्त किंमत आकारली जात असल्याचे व अनावश्यक खरेदी करुन साठा होत असल्याचे निर्देशनास आला आहे. दरम्यान याबाबत तक्रार केल्यास संबधितावर अन्न व औषध प्रशासनांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे दौंड यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोना विषयी जनतेला कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास कोकण भवनमध्ये कोरोना विषयी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन देखील दौंड यांनी केले आहे.
हेही वाचा -'अजितदादांमुळे दुसऱ्याचे सोपे पुस्तक वाचायची गरज नाही'