ठाणे- केडीएमटीची (कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन) बस कल्याण रेल्वे स्थानकातून पनवेलच्या दिशेने निघाली असता, नेवाळी चौकात दुपारच्या सुमारास बंद पडल्याने भर उन्हामध्ये धक्का द्यावा लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनकडून बसच्या दुरुस्तीवर लाखोंचा निधी खर्च करूनही परिवहन सेवेचा ढासळलेला कणा सध्या प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे.
हेही वाचा -भिवंडी पालिका कर्मचाऱ्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सकाळच्या सुमारास कल्याणच्या दिशेकडून पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केडीएमटीची बस नेवाळी चौकात बंद पडल्याने नेवाळी चौकात चहू बाजूने वाहतूक कोंडी झालेली पाहावयास मिळाली. या बसने बहुसंख्य नागरिक प्रवास करत असताना रखरखत्या उन्हात बस बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना वाहक व चालकांनी खाली उतरून एसटीला धक्का मारण्याची विनंती केली. त्यावेळी प्रवाशांच्या अथक प्रयत्नांनंतर बस सुरू झाली अन् पुढच्या प्रवाशाला निघाली. मात्र, प्रवास करणाऱ्या कामगारांना लेटमार्कचा सामना करावा लागला.
हेही वाचा - वडिलांच्या मदतीला लेक आली धावून; नताशा आव्हाडची प्रचारात उडी
कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरु केलेल्या परिवहन सेवेचा सर्वाधिक फायदा हा कामगार आणि शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, सततच्या बंद पडणाऱ्या बसेसमुळे शेतकरी आता टेम्पोचा आधार घेत शहराची वाट धरत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांनी जीव व्याकुळ झालेल्या बसेसला कधी महापालिका सुरळीत करणार आणि केडीएमटीसाठी कधी अच्छे दिन येणार? असा प्रश्न सध्या प्रवासी वर्गातून केला जात आहे.