ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने गोळा करुन त्यांना खबरदारी म्हणून पुढील 14 दिवस क्वारंटाईन करण्याडत येत आहे. मात्र, काही रुग्णांमध्ये 14 दिवसानंतरही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने यापुढे क्वारंटाईन कालावधी 28 दिवसांचा करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे.
कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका क्षेत्रात विविध स्तरावर युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत येत आहे. मात्र, त्यानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. कोरोनाबाधितांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींमध्ये 14 दिवसांनंतरही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.
क्वारंटाईन झालेल्यांतील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती 14 दिवसानंतर इतरांनाही बाधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती तसेच प्रवासाचा इतिहास असणाऱ्या प्रवाशांचा क्वारंटाईन कालावधी 14 दिवसावरुन 28 दिवसांपर्यंत करण्यात येत आहे. त्या अन्वये अशा रुग्णांना, रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून वा बाधित भागातून प्रवास केल्यांपासून 28 दिवसापर्यंत क्वारंटाईन करण्याात येणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. महापालिका हद्दीत आजही कोरोना बाधित 6 आढळून आले. एकूण रुग्णांची संख्या आता १४३ झाली आहे.