महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत भाजप उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन; रॅली संपताच प्रचार साहित्य रस्त्यावर

भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढली. मात्र, या मिरवणुकीनंतर प्रचार साहित्य रस्त्यावर आढळून आले.

कपिल पाटलांची रॅली

By

Published : Apr 8, 2019, 8:37 PM IST

ठाणे - महायुतीचे भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शिवाजी चौकातून मिरवणूक काढली. मात्र, या मिरवणुकीनंतर प्रचार साहित्य रस्त्यावर आढळून आल्याने उमेदवाराच्या शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप-शिवसेना-रिपाइं आणि श्रमजीवी संघटना या महायुतीचे उमेदवार पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मिरवणुकीत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना उन्हापासून बचाव व्हावा. याकरता भाजप-सेनेच्या टोप्यासह इतर प्रचार साहित्य देण्यात आले होते. मात्र मिरवणूक संपताच युतीचे प्रचार साहित्य रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आले.

कपिल पाटलांची रॅली

गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांना नागरिकाकडून पसंती दर्शवली. यामुळे मला उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. शिवाजी चौकातून वंजार पट्टी नाका मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना पालकमंत्री शिंदे यांनी भिवंडीतील जागेसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील युतीच्या जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांच्याकडे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे भाजपचे कोकण प्रभारी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, किसन कथोरे नरेंद्र पवार, महेश चौगुले, निरंजन डावखरे तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आणि रिपाइं शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details