ठाणे - बँक लुटण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीच्या कल्याण पोलिसांच्या चोरी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहे. या टोळीच्या म्होरक्यासह 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपींवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात तब्बल 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून हे सर्व आरोपी आंध्रप्रदेश व तमिळनाडू येथे राहणारे आहेत. बँकेबाहेर ही टोळी रेकी करुन बँक लुटण्याची शक्कल लढवत होती. यातील काही आरोपी एका बँकेबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले होते. वाढत्या चैन स्नेचींग आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कल्याण डोंबिवली शहरासह ग्रामीण भागात गस्ती वाढवल्या आहेत.
रविवारी कल्याण शहरात पोलिसांची गस्त सुरु असताना अँटी रॉबरी स्कॉडच्या पथकाने मोटारसायकलवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इलियाराज केशवराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता टोळीचा म्होरक्या सालोमन लाजर गोगुला हा आपल्या साथीदारांसह कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असणारी राष्ट्रीयीकृत बँक लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी या बँकेच्या परिसरात सापळा रचून बँक लुटण्यासाठी आलेल्या 9 जणांना अटक केली. सालोमन लाजर गोगुला, संजय नायडू, बेन्जीमन इरगदीनल्ला, दासू येड्डा, अरुणकुमार पेटला, राजन गोगुल, मोशा याकुब मोशा, डणीयल अकुला इलियाराज केशवराज अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या टोळीकडून पोलिसांनी ३ मोटरसायकल, मिरची पावडर, ३ कोयते, २ चाकू, ३ नायलॉन रस्सी, खुजली पावडर, एक कटावणी, २ हेल्मेट, २ रिफ्लेक्टर जाकेट, २ बेचक्या लोखंडी गोळ्या, काच कटर, २ स्क्रू ड्रायव्हर, २५ मोबाईल हेंडसेट, २५ वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे आरोपी एखाद्या इमारती मध्ये किंवा एखादा चाळीतील रूम भाड्याने घ्यायचे. आणि आजूबाजूच्या बांधकाम सुरु असलेल्या साईटवर बांधकाम मजूर म्हणून काम करत असल्याचे भासवून दिशाभूल करत होते. हे आरोपी बँकेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करत त्यांच्या अंगावर घाण किंवा खाजखूजली टाकून या ना त्या कारणाने त्यांचे लक्ष विचलित करून त्याच्याजवळील मुद्देमाल लंपास करायचे. तसेच छोट्या बेचकीच्या आधारे कारची काच फोडून गाडीतील रोकड लुटण्याचे गुन्हे देखील या टोळीने केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० गुन्हे आरोपींवर दाखल असून या आरोपींवर महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नागपूर, गोंदिया आणि कर्नाटक राज्यात ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचेही उपायुक्त पानसरे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॉबरी स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दीपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, उपेश सावळे, पोलीस नाईक भावसार, रवींद्र हासे, शिपाई चिंतामण कातकडे, सुनील गावित आदींच्या पथकाने ही कारवाई केली.