ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्पात सन 2016 मध्ये समावेश झाला. 24 प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली. यात अनेक कामांची घोषणा झाली असली, तरी केवळ चार वर्षांत सिटी पार्क आणि पालिका मुख्यालयामध्ये सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूमच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटीचा 1 हजार 445 कोटीचा प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. त्याला 2016 मध्ये सरकारने मंजुरी दिली. मात्र स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांची कामे संथगतीने सुरु असल्याचे दिसून आले आहे.
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पावर नागरिकांच्या प्रतिक्रिया स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एरिया बेस व पॅन सिटी या दोन प्रकारात करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांपैकी केवळ सिटी पार्कच्या कामाला सुरुवात झालेली आहे. सिटी पार्कप्रमाणेच स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याला कोट्यवधी रुपये खर्च होणार असून निविदा आणि पुढील चर्चेमध्ये गाडी थांबली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारची 2022 ची मुदत असून तो राज्य शासनाकडून रद्द होतो का, अशी चर्चाही रंगली आहे.
संथगतीच्या कामावरून कपिल पाटीलांनी व्यक्त केली नाराजी
आतापर्यंत 194 कोटी रुपयांचा निधी महापालिकेस केंद्र व राज्य सरकारकडून स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेला असताना, प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्याची गती वाढविण्याच्या सूचना खासदार कपिल पाटील यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. तसेच नाराजी व्यक्त केली होती.
वाहतूक व्यवस्थापन -
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महापालिका मुख्यालयात कंट्रोल कमांड रूम तयार करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 20 ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारत आहे. त्यापैकी कल्याणमध्ये पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारली आहे. कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास, व्यवस्थापन आणि सुशोभीकरण करणार आहे. परिवहन उपक्रम हा नागरिकांना वाहतूक सेवा पुरवणारा उपक्रम असल्याने ‘वाहतूक व्यवस्थापन’ या अंतर्गत परिवहन उपक्रमाची भूमिका स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाची राहणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील बसथांब्यांची उभारणी त्यांच्यावतीनेच केली जाणार आहे. परंतु, त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अन्यत्र बसथांब्यांची उभारणी केडीएमटी उपक्रमांतर्गत केली जाणार आहे.
कल्याण- डोंबिवली स्मार्ट शहरे -
सद्यस्थितीला उपक्रमाचे 124 बसथांबे आहेत. तर प्रस्तावित थांबे 119 आहेत. फेब्रुवारी पासून आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या कामांना गती दिलेली आहे. जी कामे प्रस्तावित केली होती, ती कामे पूर्ण गतीने करत आहोत. कोरोना काळात सर्व यंत्रना व्यस्त होती, पावसामुळे कामाचा वेग मंदावला होता, मात्र आता ही कामे पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली असून येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली स्मार्ट शहरे होतील, असा विश्वास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणूक सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी ठरणार -
स्मार्ट सिटीमध्ये पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांची कामे होणे अपेक्षित होते. त्यासाठी पालिकेने दर वर्षी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अथवा जमा दाखविणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी दूर होणे, शहरातील सुरक्षा, पाणीसमस्या, कचराप्रश्न सोडविणे आदी कामे स्मार्ट सिटीमध्ये आखली असली तरी केवळ चर्चा आणि बैठकांमध्ये स्मार्ट सिटीचे गाडे अडले आहे. नवीन वर्षामध्ये स्मार्ट सिटीमधील एक प्रकल्प तरी नागरिकांना मिळेल का, असा सवाल केला जात आहे. याचवर्षी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून सत्ताधारी पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड होऊन 5 वर्षे होत आहेत. मात्र, अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे केवळ स्मार्ट सिटीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालत असून प्रत्यक्ष विकास कधी दिसणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.