ठाणे - 'कोरोना आजार होतो, आता त्याचा बाजार' असे वक्तव्य मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर या वक्तव्यावर कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यात राजकीय वाद रंगला होता. मात्र महापालिका आयुक्तांनी वादावर पडदा टाकत मनसेच्या आमदारांचे नाव न घेता भावनिक प्रतिउत्तर दिले आहे. तसेच कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला मदत व सूचना करण्याचेही सांगत त्या वक्तव्यावर आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी खंत व्यक्त केली आहे.
माहिती देतांना महापालिका आयुक्त - 'त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण'
पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना युद्धा असलेली १७ कर्मचाऱ्यांचे निधन झाले. तसेच अनेक नगरसेवक महापौर, कोरोना बाधित होऊन काही जणांचे निधन झाले. असे असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पक्ष पालिका प्रशासनांवर टीका करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होते, अशी नाराजीही महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.
- 'कोविड कालावधीत उत्तम काम'
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोविड कालावधीत उत्तम काम केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील एम.आय.डी. सी. परिसरातील विभा इंडस्ट्रीच्या जागेवर महापालिका उभारत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी करते वेळी ते बोलत होते. कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी अनेक जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली आहे. आता मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरतांना दिसून येत असल्याने रुग्णांच्या विशेषत: बाल रुग्णांच्या सोयीसाठी हे रुग्णालय उभारण्यात येत आहे आणि आवश्यकतेनुसार ते सुरु करण्यात येईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.
- 'एम.एम.आर.डी.सी.कडून ५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर'
सुसज्ज कोविड रुग्णालयाचा फायदा नागरिकांना विशेष करुन आजूबाजूच्या ग्रामिण भागातील रुग्णांना नक्कीच होईल, असे उद्गार डोंबिवलीचे भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी काढले. विभा इंडस्ट्रीमध्ये तात्पुरते कोविड रुग्णालय बनविण्यासाठी पालकमंत्र्यांनी एम.एम.आर.डी.सी.कडून ५ कोटी ५० लाख निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण यांनी सुचविल्यानुसार विभा इंडस्ट्रीच्या जागेवर एक सुसज्ज रुग्णालय उभे राहत असून लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी ते सुरु करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
- तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज
महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता कोरोना रुग्णांसाठी बेड्स कमी पडू नये, म्हणून महापालिकेने एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे तळ + दोन मजल्याचे विभा रुग्णालय उभारले असून या रुग्णालयात ५३१ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. त्यापैकी तळ मजल्यावर आयसीयू 198 बेड्स, पहिल्या मजल्यावर २३८ ऑक्सीजन बेड्स असून दुस-या मजल्यावर आयसीयू ५३ बेड्स आणि ऑक्सीजन ४२ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तळ आणि वरिल दोन्ही मजल्यावर अद्ययावत अग्निशमन प्रणाली बसविण्यात आली आहे. तळ मजल्यावर रुग्णांसाठी स्ट्रेचर लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुमारे २१ हजार लिटर ऑक्सीजन टँकची व्यवस्था देखील विभा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे.
- आतापर्यत १ लाख ४२ हजार ७१८ रुग्णांना डिस्चार्ज
कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊन दिवसागणिक हजारो रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल ठरली होती. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेतील एकादिवशीची सर्वाधिक रुग्ण संख्या २ हजार ४६५ वर गेली होती. त्यांनतर मात्र हळूहळू रुग्णसंख्या कमी होत, एक अंकी आकड्यावर आली होती. मात्र पुन्हा गेल्या आठवड्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून चार दिवसांपासून एक हजारावर रुग्णसंख्या आढळून येत आहे. आतापर्यत १ लाख ४२ हजार ७१८ रुग्णांना कालपर्यत डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे काल आढळून आलेले १ हजार २४८ रुग्ण आढळून आली आहे. सद्याच्या घडीला साडे सहा हजार रुग्णांवर उपचार सुरु असून या रुग्णांपैकी निम्याहून अधिक रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -Kolhapur Corporation Vehicle Accident : कोल्हापूर महापालिकेच्या चारचाकी वाहनाची धडक लागल्याने ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू