ठाणे Kalwa Hospital Update : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना उलटला आहे. मात्र अद्यापही समितीचा चौकशीचा अहवाल अजूनही समोर आलेला नाही. हा अहवाल अंतिम टप्प्यात असून अधिकारी कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं सदरचा अहवाल समोर येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीयं. यामुळं पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मात्र तिलांजली मिळालीय. (kalwa Hospital Update)
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीसाठी समितीची नियुक्ती : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. हे रुग्णालय नेहमीच चुकीच्या कारणांमुळे चर्चेचा विषय बनत असतं. परंतु, ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यातच या रुग्णालयात सोमवारी चार आणि मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णंच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली होती. माध्यमांमध्ये ही बातमी येताच सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचारी वर्गाला चांगलंच धारेवर धरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यासंदर्भात चौकशीसाठी समितीही नियुक्त केली. या समितीनं संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन पंधरा दिवसांत अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आता एक महिना उलटूनही या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला नाही. यामुळे अधिकारी व राजकीय मंडळींना या घटनेचं गांभीर्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 25 ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणं अपेक्षित होतं. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येणार होती. परंतू, आता 25 ऑगस्टनंतर या समितीला दहा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला होता. ते दहा दिवस उलटूनही चौकशी समितीचा अहवाल समोर येण्याची चिन्हं दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात आलंय.