ठाणे -काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या होर्डिंग्जच्या उभारणीसाठी ठाण्यातील ४ खासदारांपैकी एका खासदाराने ५ लाखांचा हप्ता घेतला आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
आव्हाड म्हणाले, की काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग पडले आहे. या होर्डिंगची उभारणीच बेकायदेशीपणे करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने होर्डिंग उभारण्यासाठी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार, त्यांची उंची, रंगसंगती, डोळ्यांवर येणारा तणाव आणि निकष न्यायालयाने घालून दिले आहेत. मात्र, ठाण्यातील एकाही ठिकाणी होर्डींग्जचे हे नियम पाळण्यात येत नाहीत. बुधवारी दुर्घटनाग्रस्त झालेला हे होर्डिंग उभारण्यासाठी एका खासदारने ५ लाख रुपयांचा हप्ता घेतला असल्याचे समजत आहे. त्यांनी हा हप्ता भागीदार म्हणून घेतला की अन्य कोणत्या प्रकारे घेतला हे माहित नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
ठाण्यात कुमार केतकर, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे आणि राजन विचारे हे ४ खासदार राहतात. केतकर यांच्याशी आपले बोलणे झाले असून ते पत्रकार परिषद घेऊन आपला या प्रकाराशी संबध नसल्याचे जाहीर करणार आहेत. पालकमंत्री शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचा काही संबध नाही, हे जाहीर करावे. सहस्त्रबुद्धे यांनी विवेकबुद्धीने आपली भूमिका जाहीर करावी. तसेच, राजन विचारेंनीही पूर्ण विचारांती आपली भूमिका सांगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.