ठाणे - व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमिवर बुधवारी ठाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस साजरा झाला. एड्स हेल्थकेअर फाऊन्डेशन संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ४० फुटांच्या कंडोमची प्रतिकृती साकारून जनगागृती करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.
आंतरराष्ट्रीय काँडोम दिवस
एएचएफ इंडियातर्फे या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यंदा 'अलवेज इन फॅशन' ही थीम निवडण्यात आली होती . एचआयव्ही, एसटीडी आणि नको असलेली गर्भारपण या तिन्ही विषयांसंबंधी जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे एएचएफ इंडियाने महाराष्ट्र स्टेट एड्स कन्ट्रोल सोसायटी या संघटनेशी भागीदारी करून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
४० फुटांचा कंडोम
या कार्यक्रमांतर्गत, मोफत कंडोम वाटप करण्यात आले. तसेच सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले होते . यासाठी मजेशीर व कल्पक मार्गांचा अवलंब आयसीडीकडून करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात कंडोमची ४० फूटांची प्रतिकृती तयार करण्यात आली. या प्रतिकृतीवर स्वाक्षऱया करून तरुणांनी विविध जागृतीपर संदेश लिहिले.
जनजागृती आणि प्रदर्शन
या कार्यक्रमावेळी एचआयव्ही तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांतर्फे बॅण्ड कार्यक्रम, फ्लॅश मॉब्स, फ्लॅश रॅम्प वॉक्स, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . पर्ल फॅशन अकादमीच्या फॅशन डिझायनर्सनी कंडोम्सपासून तयार केलेले कपडे, डिझाईन्स, अॅक्सेसरीज यावेळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. 'कंडोम फॅशन गॅलरी'मध्ये या कलाकृती सामान्य लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत .