ठाणे Thane Water Story : ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने उत्पन्न वाढीसाठी नळ संयोजनांवर मीटर बसवलं खरं, परंतु त्यांचा हा प्लॅन स्पशेल फसल्याचा प्रत्यय सध्या येत आहे. उत्पन्न वाढीसाठी नळ संयोजनांवर मीटर बसवून, पूर्वीच्याच जुन्या दरानुसार पाणी बिलाची वसुली केल्याने, ठाणे महानगरपालिकेला कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागत आहे. पाणी खरेदी, कर्मचारी आणि निगा देखभाल याच्यावर पाणीपुरवठा विभागाकडून वार्षिक २५० कोटी रुपये खर्च केला जात आहे. परंतु पाणी विभागाचं वार्षिक उत्पन्न शंभर कोटीच्या आसपास असल्याचं आकडेवारीनुसार समजतंय. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने, पाणीपुरवठा विभागाला आता पाणीपुरवठा करणं कठीण जात असल्याचं चित्र आहे.
नेत्यांनी केला दरवाढीला विरोध : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वाना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असून आज ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष, स्टेमकडून ११५ दशलक्ष, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष आणि स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर एवढे पाणी दररोज उचलले जाते. परंतु पाणी गळती आणि इतर उत्पन्न खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने विविध भागात एक लाखाहून अधिक स्मार्ट मीटर बसवले. या मीटरद्वारे वापरत असलेल्या पाण्याचे बिल आकारले जात असल्याने, पाण्याची नासाडी देखील टाळली जात होती. पाण्याचे मीटर बसवताना महापालिकेने नवीन दरही निश्चित केले. परंतु निवडणुका जवळ असल्याने काही राजकीय नेत्यांनी या दरवाढीला विरोध केला. तसे पाहायला गेले तर मागील दहा वर्षात दर वाढ झाल्याने पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नावर आधीच परिणाम होत होता. त्यातच काही महिन्यांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पूर्वीच्याच दराने कराची वसुली करण्याचं राजकीय मंडळींनी निश्चित केल्यामुळं त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. त्यामुळं डिसेंबर अखेरपर्यंत पाणीपुरवठा विभागाकडून २२५ कोटींचं लक्ष असताना केवळ ७१ कोटींचीच वसुली झाल्याचं स्पष्ट झालंय.