ठाणे -नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट - १ च्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने ठाण्याच्या केसल येथील स्वागत हॉटेलमध्ये बालिकेच्या विक्रीची दीड लाखाची रक्कम घेणाऱ्या मध्यस्थी नवजात बालिकेचे आई - वडील, दोन मध्यस्थी, आईचा भाचा आणि बहीण अशा सहा जणांना बेड्या ठोकल्या आहे. अटक केलेल्या आरोपींवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा -BMC Pipeline burst : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाण्याच्या नासाडी
शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट - १ च्या पथकाला याप्रकरणी माहिती मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून मध्यस्थी असलेल्या दलाल महिलेला संपर्क केला. बाळाचा सौदा हा दीड लाखात ठरला. त्यानंतर बाळाची विक्री करणाऱ्या आई - वडील आणि मध्यस्थी यांना ठाण्याच्या केसल मिल येथील स्वागत हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. त्यानुसार संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वागत हॉटेल्स येथे बाळाची विक्री करण्यासाठी संबंधित सर्वच कागदपत्रांसह सहा जण उपस्थित राहिले. यात नवजात बालिकेची आई मुमताज वकील अन्सारी ( वय २९ ), रिक्षा चालक वडील वकील शकील अन्सारी ( वय ३७, रा. शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे ) महिला दलाल झिनत रशिद खान ( वय २२ रा. मुंब्रा, ठाणे ) पुरुष दलाल वसीम इसाक शेख ( वय ३६ रा. रेहमत चाळ, मुंब्रा, ठाणे ) नवजात बाळाची मावशी कायनात रिझवान खान, ( वय ३० रा. गुलमोहर चाळ मुंबा, ठाणे ) बाळाच्या आईचा भाचा मुझम्मिल रिझवान खान ( वय १८ वर्षे, रा. गुलमोहर चाळ, मुंबा, ठाणे) यांचा समावेश होता.