उल्हासनगर (ठाणे) - कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून सर्वत्र संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यातच मुंबई परिसरात राहणारे पती-पत्नी एका कारला नगरसेविका असे स्टिकर लावून उल्हासनगर येथील नातेवाईकांना भेटण्यास आले होते. हे कुटुंब कोणतेही विशेष कारण नसताना उल्हासनगरमध्ये आले असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लालचंद प्रेमाणी (४० ) व रोशनी प्रेमाणी (३६) असे गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
संचारबंदीत लावले नगरसेविकेचे स्टिकर.. पती-पत्नीचा मुंबई-उल्हासनगर प्रवास; गुन्हा दाखल, कारही जप्त - ठाणे
मुंबई परिसरात राहणारे पती - पत्नी एका कारवर नगरसेविका असे स्टिकर लावून उल्हासनगर येथील नातेवाईकांना भेटण्यास आले होते. या पती पत्नीकडे कोणतेही वैद्यकीय कारण नसताना किंवा अधिकृत परवाना नसताना उल्हासनगरमध्ये आले असल्याचे निष्पन्न झाले.
मुलुंड परिसरात राहणारे लालचंद प्रेमाणी आणि त्याची पत्नी रोशनी प्रेमाणी हे आपल्या दोन मुलींसह सायंकाळच्या सुमारास मारुती स्विफ्ट कारमधून उल्हासनगरमध्ये फिरत होते. तसेच त्यांच्या कारवर नगरसेविका असे स्टिकर लावलेले होते. मात्र सदर कार उल्हासनगर - २ येथील मधूबन चौक येथून जात असताना पोलीस पथकाने त्यांना थांबविले. त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता ते मुलुंड येथील रहिवासी असून उल्हासनगर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असल्याचे समोर आले.
या पती पत्नीकडे कोणतेही वैद्यकीय कारण नसताना किंवा अधिकृत परवाना नसताना उल्हासनगरमध्ये आले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात चंदरलाल व त्याची पत्नी रोशनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली आहे. या कारची पासिंग उल्हासनगरची असून ती कोणत्या नगरसेविकेची आहे ? की त्या दाम्पत्याने नगरसेविकेचा बनावट स्टिकर वापरला याचा तपास महिला सा.पो.नि. अनुपमा खरे करीत आहेत.