ठाणे- नुकत्याच कोलकात्यामध्ये झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात 'आयएमए'ने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कल्याणमधील 500 डॉक्टर सहभागी झाले आहेत. तसेच आयुर्वेद व्यासपीठ कल्याण शाखेच्या डॉक्टरांनीही काळ्या फिती लावून काम करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी बंद पुकारला असला तरी त्यातून अत्यावश्यक सुविधांना मात्र वगळण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या देशव्यापी बंदमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ५०० डॉक्टर सहभागी - देशव्यापी बंद
कोलकात्यामध्ये झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात 'आयएमए'ने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये कल्याणमधील 500 डॉक्टर सहभागी झाले आहेत.
कोलकात्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून त्यात डॉक्टर वर्गही भरडला जात आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. कल्याण आयएमए संघटनेनेही या देशव्यापी बंदला पाठिंबा देत डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याविरोधात निदर्शने केली. सोमवारी सकाळी कल्याणच्या मुरबाड रोड परिसरात कल्याण आयएमएचे सर्व सदस्य काळ्या फिती लावून एकत्र आले होते. आम्ही रुग्णांसाठी आमची तत्पर सेवा देण्यासाठी बांधील असून सरकारने आमच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी केली.
तसेच आयएमएच्या या देशव्यापी आंदोलनाला आयुर्वेद व्यासपीठानेही पाठिंबा दर्शवला आहे. त्याअंतर्गत व्यासपीठाच्या कल्याण शाखेचे सुमारे 100 पेक्षा अधिक डॉक्टर आज काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवत असल्याची माहिती डॉ. अभिजित ठाकूर यांनी दिली.