ठाणे :जलजीवन योजने अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १९६ गावांचा पाणीप्रश्न निकालीकाढण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते १३ गावांमध्ये जळकुंभांचे भूमिपूजन कऱण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी 'सरपंच'च ठेकेदार असेल तर विकास कामे अधिक चांगली होणार असल्याचे विधान अंबाडी येथे भूमिपूजना वेळी केले आहे. वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३८ च्या कलमात सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये संबंधी माहिती राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली. मात्र त्यामध्ये सरपंचांनीच कामाचा ठेका घेण्याचा उल्लेख नसल्याने त्यांच्या विधानावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
हर घर जल,हर घर नळ :केंद्र शासनाने पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी ''हर घर जल,हर घर नळ"या ब्रीदवाक्याला अनुसरून ग्रामीण भागातील तळागाळातील खेड्यापाडयातील सर्वसामान्यांसाठी पंचायत समित्यांच्या अंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत 'जलजीवन योजना' अंमलात आणली आहे. या योजने अंतर्गत २०२४ पर्यंत घराघरात नळजोडणी करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात एकूण १२१ ग्रामपंचायती आहेत. या १२१ ग्रामपंचायतीमधील २१८ गावांपैकी १९६ गावांचा जलजीवन योजने अंतर्गत पाणीप्रश्न मिटणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी ३ गावांच्या दौऱ्या दरम्यान दिली.
जलकुंभांचा भूमिपूजन सोहळा :भिवंडी तालुक्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत शनिवारी जलकुंभांचा भूमिपूजन सोहळा कपिल पाटील यांच्या हस्ते केवणी, दिवे, कोपर, वडूनवघर, टेंभिवली, जू नांदुरखी, कांबे, खोणी, कवाड नाका, अनगाव नाका, आवले, अंबाडी, झिडके या १३ गावांमध्ये पार पडला. या दौऱ्यानिमित्त पाटील जुनांदुरखी येथे म्हणाले की,ग्रूप ग्रामपंचायत जुनांदुरखी-टेंभवली ही मुलुंडचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तक घेतली असून त्यांच्या वार्षिक खासदार निधीतून ५ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देवून कामे पूर्ण करण्यासाठी संग्राहक व जिल्हा नियोजन अधिकारी आणि महेंद्र कोटक यांची बैठक घेवून चर्चा करणार असल्याचे सांगून या गावातील नागरिकांनी कामांच्या माहितीचा आराखडा तयार करून त्या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी कपिल पाटील ग्रूप ग्रामपंचायत जुनांदुरखी-टेंभवली ग्रामस्थांना केले आहे.