ठाणे - बायकोने केवळ भात शिजवला नसल्याच्या वादातून नवऱ्याने तिची हत्या ( Husband kills wifein Bhiwandi ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ( Nizampura Police ) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे. शंकर वाघमारे (वय, २३) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर ज्योत्स्ना ( वय, २०) असे हत्या झालेल्या बायकोचे नाव आहे.
लाकडी दांडक्याने हत्या :आरोपी शंकर हा भंगार विक्रेता असून तो भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील बाळाराम चौधरी यांच्या चाळीत भाड्याने मृत पत्नीसोबत राहतो. त्याचे मृत ज्योत्स्नासोबत वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यातच काल (मंगळवारी) रात्रीच्या जेवणात आरोपी नवऱ्याने भात शिजविण्यासाठी बायकोला सांगितले. मात्र तिने भात शिजवलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, नवऱ्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पाठीत पोटात बेदम मारहाण केली. या लाकडी दांडक्याच्या हल्ल्यात ती घरातच जमिनीवर पडल्याचे तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. त्यावेळी बायको रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नवऱ्याला शेजाऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल गंभीर जखमी अवस्थेत बायकोला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले.