ठाणे - पत्नीला व्हॉटसअपवर 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीला भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी ७ महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पती तलाक दिल्यानंतर दुबईत पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नंबर प्राप्त करून त्याच्या विरोधात 'लूक आउट' नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस बजावल्याची कुणकुण लागल्याने तो भारतात परत येताना मुंबई विमानतळ पोलीस अटक करतील या भीतीने न उतरता, तो अमृतसर विमानतळावर उतरला असता त्याला अमृतसर पोलिसांनी ताब्यात घेऊन भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नदीम शेख असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपी पतीचे नाव असून तो टेक्निकल अभियंता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरजू शेख (23 रा. दिवनशाहा दर्गा) हिचा 18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह (लग्न) झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051 रुपये रोख व संसारोपयोगी वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर पीडित पत्नीला पती व तिच्या सासरच्या मंडळींनी तू पसंद नसल्याचे कारण देत तिला शिवीगाळ करून मारझोड नेहमीच करीत होते. तर आरोपी नदीम हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतरही पीडित महिलेने पाच वर्ष आपला संसार टिकवून ठेवला होता. .
हेही वाचा -ठाण्यात शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात पडली पार