ठाणे - कल्याण पश्चिमेला दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या नॅशनल उर्दू शाळेची मध्यरात्रीच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर महापौर, स्थायी समिती सभापतीसह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ज्या घरांवर भिंत कोसळली ती घरे अनधिकृत असल्याची कबुली देत, या अनधिकृत बांधकामामागे सूत्रधार कोण ? याचा शोध घेऊन कारवाई करणार असल्याचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ज्या घरांवर भिंत कोसळली ती घरे अनधिकृत, सभापतींची कबुली - स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे
नॅशनल उर्दू शाळेची मध्यरात्रीच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर महापौर, स्थायी समिती सभापतीसह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
कल्याण डोंबिवली शहरात सोमवारी सायंकाळपासून संततधार सुरू आहे. पावसामुळे महापालिकेच्या ' क ' प्रभाग क्षेत्रात कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी 3 धोकादायक इमारतीचे काही भाग कोसळले आहेत. तर मध्यरात्रीच्या सुमारास शाळेची भिंत कोसळून त्यामध्ये शोभा कचरू कांबळे (वय 60), करीना महम्मद चांद (वय 25) आणि हुसेन (वय 3) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर आरती कर्डीले (वय 15) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर महापौर वनिता राणे, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे, यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, गेल्या 5 ते 7 वर्षात या शाळेमागे असलेल्या भटाळे तलावात भराव करून अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या विषयावर अनेक वर्षांपासून अनेकदा महासभेत कारवाईसाठी अनेक नगरसेवकांनी लक्षवेद्या, प्रश्न, चर्चा उपस्थिती केल्या. यावर पालिका प्रशासनाकडून प्रत्येक वेळी सभागृहात कारवाईचे आश्वासन देण्यात आले. मात्र, संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी अनेक वेळा कारवाई केल्याचा दिखावा करत अहवालात नमूद करून आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांना दिले जात असल्याचे समोर आले आहे.