ठाणे - भिवंडी तालुक्यातील टेंभवली येथील एक मजली कौलारू घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीची झळ शेजारच्या 3 घरांनाही बसली आहे. सुदैवाने आग लागलेल्या घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.
भिवंडीत घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान - भिवंडीत घराला भीषण आग
भिवंडी तालुक्यातील टेंभवली येथील एक मजली कौलारू घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.
प्रमोद श्रीपत मढवी, असे आग लागलेल्या घर मालकाचे नाव असून, त्यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या आगीत सुमारे ३० मंडपाच्या कापड साहित्यासह लाईटिंग साहित्य, झुंबर, डेकोरेशन साहित्य, १५ क्विंटल तांदूळ, फर्निचर, कपडे, भांडी आदी १० लाखांचे सामान जळून खाक झाले आहे. प्रमोद मढवी हे कुटुंबीयांसह दोन महिन्यांपूर्वीच नवीन घरात राहण्यास गेले आहेत. त्यातच घरातील विद्युत पुरवठा बंद असताना घराला आग लागली कशी? की ही आग लावण्यात आली? असा प्रश्न घरमालक प्रमोद मढवी यांनी उपस्थित केला असून, तशी शंका त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे.
या भीषण आगीच्या नुकसानीचा पंचनामा जुनादुखी तलाठी यांनी करून तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे सादर केला आहे. या आगीची माहिती भिवंडी अग्निशामक दलास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अग्निशामक दल पोहोचेपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी झाले होते.