ठाणे: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. या पाठोपाठ आता रुग्णांना बरे करणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा काळाबाजार चक्क महापालिका रुग्णालयातच सुरू असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खाजगी रुग्णालयाच्या लूटीनंतर आता महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णांकडूनच प्लाझ्मा थेरपीसाठी ज्यादा पैसे घेतल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे.
कोरोनामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस देखील त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असतांना अनेक पोलीस देखील कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना प्लाझा थेरपीसाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार रुग्णाच्या नातेवाइकांनी प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील अर्पण ब्लड बँकेत डोनर नेला. या डोनरचा प्लाझ्मा घेऊन त्यावर प्रोसेस करून रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आले. मात्र, या प्रोसेससाठी त्यांच्याकडून तब्बल ११ हजार रुपये आकारण्यात आले. बाहेर याच प्रोसेससाठी ६ ते ७ हजार रुपये घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.