ठाणे:बदलापूर पूर्वेतील एमआयडीसी वसाहतीत असलेल्या गगनगिरी फार्मा केमिकल कंपनीमध्ये ज्वलनशील केमिकल मोठ्या प्रमाणात साठा होता. त्यातच आज दुपारच्या सुमारास जेवणाची वेळ असल्याने काही कामगार जेवणासाठी गेले होते. त्याच सुमाराला कंपनीमध्ये अचानक आगीने पेट घेतला. काही क्षणातच आगीने भीषण रुप धारण केले. या आगीचे धूर ६० ते ७० उंच फूट हवेत दिसत असल्याने आसपासच्या कंपनीमधील कामगारांनीही कंपनी बाहेर पळ काढला. तर केमिकलचे स्फोट होत असल्याने परिसरात अधिकच भीतीचे वातावरण पसरून नागरिकांनीही पळ काढला.
अग्निशमन दलाचे प्रयत्न : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी आणि फोमचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बदलापूरसह अंबरनाथ एमआयडीसी तसेच अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि तळोजा एमआयडीसी मधील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, बदलापूर एमआयडीसी वसाहतीत असलेल्या अग्निशामक दलाच्या केंद्राच्या समोरच गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जात होते. मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. कारखान्यात अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली आणि संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली.