ठाणे - राज्यात गुटखा विक्रीला बंदी असल्याने छुप्या पद्धतीने वाहतूक करुन विक्री होताना दिसत आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील विविध शहरात चोरीच्या मार्गाने आणला जाणारा एक कोटी रुपयांचा गुटखा भिवंडीत पकडण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, यावेळी 2 ट्रकही जप्त करण्यात आले.
भिवंडीत 1 कोटीचा गुटखा जप्त, दोन ट्रक चालक ताब्यात - thane crime news
गुजरातमधून भिवंडीत गुटखा आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासान विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा मारला असता तेथील गोदामात 1 कोटी 1 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा तसेच 20 लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण 1 कोटी 21 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्रात गुटखा बंदी नंतरही गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे. भिवंडी तालुक्याच्या हद्दीतील गोदाम पट्ट्यात प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर साठवला जात असून तेथून तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण भिवंडी या परिसरात विक्री केल्या जातो तसेच पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा कंपाऊंड भूमिका कॉम्प्लेक्सयेथील गोदामात गुजरात येथून गुटखा आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त शंकर राठोड, सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, संतोष वझरकर, उत्तरेश्वर बढे यांनी या ठिकाणी छापा मारला असता तेथील गोदामात गुटख्याचे 374 पोते आढळले. सुगंधित पान मसाला, तंबाखू, गुटखा असा एकूण 1 कोटी 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच 20 लाख रुपये किमतीचे दोन ट्रक क्रं. (एम एच04 जेयू 7784 ,जीजे 15 एटी 9685) असा एकूण 1 कोटी 21 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबईतील गोवंडी येथील गुटखा व्यापारी फिरोज अब्दुल खान याने हा गुटखा विक्रीसाठी मागविला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांनी दिली. तर, या दोन्ही ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले असून अन्न व औषध प्रशासन अधिकारी शंकर राठोड यांनी या विरोधात नारपोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल केला.