ठाणे - दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाण्यात कोपिनेश्वर न्यासच्यावतीने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोपिनेश्वराची पालखी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. युती आणि आघाडीने देखील या शोभा यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.
या शोभा यात्रेत कोपीनेश्वरांची पालखी जांबळी नाका येथून राम मारुती रस्तामार्गे तलावपाळी परिसरात आल्यानंतर या यात्रेत सर्वच प्रकारची जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी झाले होते. यंदा स्वागत यात्रेचे १८ वे वर्ष होते. या यात्रेत ठाणेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठाण्यात कोपिनेश्वर न्यासच्या वतीने नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेत खासकरून दुचाकी वरून महिला पारंपारिक पद्धतीने नऊवारी साड्या परिधान करून दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. 'मतदान आपल्या हक्काचे अशा प्रकारचा संदेश या रथयात्रेतून देण्यात आला. तसेच वृक्ष सवर्धन, सौर उर्जेचा वापर, वारकरी संप्रदाय दिंडी , मलखांबची प्रात्यक्षिके असे एकूण ४० हून अधिक रथ सहभागी झाले होते. ठाणेकर चौका चौकात या स्वागत यात्रेचे स्वागत करत होते.
श्रीकोपिनेश्वराची पालखी चिंतामणी चौक या ठिकाणी आली असता जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे, युतीचे विद्यमान खासदार राजन विचारे भाजपचे आमदार संजय केळकर, आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक हे देखील सहभागी झाले होते. यंदाची गुढी विजयाची गुडी असणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर दुसरीकडे आघाडीच्या वतीने देखील मोठ्या उत्साहात विजयाची गुडी उभारू असे ठाणे शहर अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी सांगितले आहे.