मुंबई-ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे सायबर विद्यापीठ आणि कौशल्य विकासासाठीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण विभागाच्या मंत्र्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेतली. यात प्राथमिक आढावा घेण्यात आला आहे.
कळव्यात सायबर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी चाचपणी - मंत्री जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. कळवा येथे सरकारची साडेसात एकरहून अधिक जागा असून या जागेवर सायबर विद्यापीठासोबत कौशल्य विकास प्रशिक्षण अथवा दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर आरोग्यविषयक इतर काही प्रकल्प उभे करता येतील काय, यावर चर्चा झाली.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. कळवा येथे सरकारची साडेसात एकरहून अधिक जागा असून, या जागेवर सायबर विद्यापीठासोबत कौशल्य विकास प्रशिक्षण अथवा दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर आरोग्यविषयक इतर काही प्रकल्प उभे करता येतील काय, यावर चर्चा झाली. या जागेला पूरक असे मुंबई विद्यापीठाचे ठाण्यातील उपकेंद्र असून त्याला जोडूनच हे नवीन प्रकल्प उभे करता येईल काय, यासाठीची माहिती घेतली जाणार आहे. ही बैठक प्राथमिक स्वरूपाची असून, त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन कळव्यातील जागेवर सरकारकडून अथवा खासगी संस्थेच्या मदतीने शैक्षणिक अथवा आरोग्यविषयक प्रकल्प उभे करण्याची तयारी केली जाणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे.