ठाणे:मिळालेल्या माहितीनुसार, नबील अब्दुल हमीद मोमीन (४२) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या एका शाळेत ४६ वर्षीय पीडित शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर याच शाळेत आरोपी शिक्षक हा क्लस्टर रिसोर्स सेंटरचा (सीआरसी) प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यातच गेल्या वर्षभरापासून आरोपी शिक्षकाची वाईट नजर पीडित शिक्षेकेवर पडली होती. तेव्हापासून तो वारंवार पीडित शिक्षिकेशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता.
शिक्षिकेशी अशोभनीय वर्तन: खळबळजनक बाब म्हणजे पीडितेने तक्रारीत नमूद केले कि, १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता पीडित शिक्षिका शाळेच्या शौचालयात गेल्याचे पाहताच आरोपी शिक्षकही त्यावेळी महिला शौचालयात शिरला. यावेळी त्याने अशोभनीय वर्तन करत पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली; मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे पीडित शिक्षिकेने संतप्त होऊन आरोपी शिक्षकाला कानशिलात लगावली. त्यानंतर आरोपी शिक्षकाने पीडितेला धमकी दिली कि, माझे उच्च अधिकारी आणि राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. मी तुला नोकरीवरून काढून टाकू शकतो. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाशी बोलल्यास तुला जीव गमवावा लागेल. एवढेच नाही तर या घटनेनंतर आरोपी शिक्षकाने इतर शिक्षकांना पीडित शिक्षिकेविरोधात भडकवण्यास सुरुवात केली.