ठाणे:जखमीने केलेल्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात प्रेयसीसह कटात सामील असेलेल्या मित्रासह इतर चार अज्ञात हल्लेखोराविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भाविका अनिल भोईर (रा. आसनगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर नदीम मनसूर खान (रा. घोटी) असे तिच्या मित्रासह चार अज्ञात हल्लेखोर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर बालाजी नामदेव शिवभगत (वय, ४५, रा. शेलवली , तालुका शहापूर) असे जखमी असलेल्या प्रियकराचे नाव आहे.
बालाजीचे अपहरण:मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बालाजी शिवभगत हे शहापूर तालुक्यातील शेलवली गावात कुटुंबासह राहत असून ते बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांचे आरोपी भाविका सोबत प्रेमसंबंध होते. मात्र भाविकाचा मित्र आरोपी नदीम हा त्यांच्या प्रेमसंबंधामुळे बालाजीवर राग धरून होता. त्यातच २८ जून रोजी सकाळच्या सुमारास भाविकाने मोबाईलवर कॉल करून प्रियकर बालाजी यांच्याकडे काही वस्तूंची मागणी केली. त्यानंतर पुन्हा सायंकाळच्या सुमारास आरोपी प्रेयसीने कॉल करून खरेदी केलेल्या वस्तू घेऊन येण्याच्या बहाण्याने प्रियकर बालाजी यांना आटगाव रेल्वे स्टेशन समोर बोलवले होते. त्यामुळे बालाजी आपल्या कारने त्या ठिकाणी पोहचले असता, आरोपी प्रेयसीसह चार अज्ञात हल्लेखोरांनी बालाजीचे अपहरण केले.
लुटमार आणि मारहाण:एका हल्लेखोराने बालाजीच्या डोक्यात चॉपरने वार केला. दुसऱ्या हल्लेखोरांनी व आरोपी प्रेयसीने जखमी बालाजीला शहापूर तालुक्यातील आटगाव गावाच्या हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या एका बंद हॉटेलच्या शेडमध्ये आणले. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्याने बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करत पिस्तुलचा धाक दाखवून अंगावरील कपडे काढत झोपवले आणि आरोपी प्रेयसीने त्याच्याशी अश्लील चाळे करत अश्याच परिस्थितीत मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यास अज्ञात आरोपींना सांगितले. त्यानंतर आरोपी प्रेयसीने बालाजीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून अंगावरील दीड लाखांच्या जवळपास दागिने हल्लेखोराच्या मदतीने लुटले. शिवाय ५० हजाराची रोकड आणि एटीएम कार्ड काढून घेतल्यानंतर प्रेयसीसह चारही हल्लेखोराने पुन्हा बालाजी यांना निर्वस्त्रच कारमधून उबंरमाळी गावाच्या हद्दीत सोडले.
अखेर पत्नीच धावली मदतीला:घटनेनंतर बालाजी यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पत्नीला दिला. माहिती मिळताच पत्नी घटनास्थळी पोहोचली. तिने जखमी बालाजीला सुरुवातीला शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २९ जून रोजी खासगी रुग्णालयात जाऊन बालाजी यांचा जबाब नोंदविला. त्या आधारे आरोपी भाविका, तिचा मित्र नदीम आणि चार अज्ञात हल्लेखोरांवर एकूण १४ विविध कलमे नोंदवून गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला.
हेही वाचा:
- Pune Crime News: कॉलेजमध्ये कोयता काढला... पोलिसांनी तिथूनच काढली त्याची वरात
- USA Student Suicide Mumbai : अमेरिकेतील अल्पवयीन विद्यार्थ्याची मुंबईत आत्महत्या
- Nanded Crime: नांदेडमधील हनुमानगड परिसरात गुंडांचा हैदोस; २५ वाहनांची तोडफोड