ठाणे - येथील कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या पिसवली गावातील बैठी चाळीत एका घरगुती सिलिंडर स्फोट होऊन आग लागली आहे. मात्र, दाटीवाटीच्या वस्तीत जाण्यास अग्निशमन दलाला अडथळा निर्माण झाला. मात्र, सुदैवाने या घटनेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही वस्ती थोडक्यात बचावली आहे.
पिसवलीतील चेतना शाळेजवळ असलेल्या श्री कॉलनी चाळ क्र. 3 मधील खोली क्र. 6 मध्ये लक्ष्मी साहू या कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्या स्वयंपाक करत होत्या. इतक्यात सिलिंडर संपल्याने त्यांनी दुसरा सिलेंडर लावला. मात्र, हा सिलिंडर लिकेज असल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या गॅसने आग लागली. ही आग हळूहळू मोठ्या प्रमाणात पसरली. त्यातच सिलिंडरचा स्फोट होऊन आग आणखी भडकली. या आगीची झळ चाळीतील अन्य 3 घरांनाही पोहोचली. त्यामुळे या आगीत तिन्ही घरांचे अतोनात नुकसान झाले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांना बंबांसह पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे हे जवान पायी पोहोचले. तोपर्यंत चाळीतील रहिवाशांनी ओले गोणपाट टाकून सिलेंडरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सिलिंडरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.