ठाणे Ganpati Festival 2023 : इर्शाळवाडी गावाला लहानपणापासून वडिलांसोबत जात असल्यानं त्या गावाशी जडलेलं भावनिक नातं जपत ठाण्यातील एका तरुणानं त्याच गावाचा देखावा बाप्पासाठी बनवत तेथील पीडितांना भावनिक श्रद्धांजली वाहिलीय. इर्शाळवाडी येथं १९ जुलैच्या काळरात्री झालेल्या विनाशानं आपण हेलावून गेल्यानं आपल्या डोक्यात तोच विषय घुमत राहिल्यानं हा देखावा उभारल्याचं सांगण्यात आलंय.
इर्शाळवाडीच्या घटनेनं व्यथित झाल्यानं देखावा : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर १९ जुलैच्या मध्यरात्री नियतीनं घाला घातला व शेकडो संसार उध्वस्त झाले. सतत होणारा मुसळधार पाऊस व त्यातच बसलेले भूकंपाचे धक्के यामुळं दरड कोसळली व संपूर्ण गावच त्याखाली गाडल्या गेलं. पहाटेच्या सुमारास आलेल्या या अस्मानी संकटानं साखर झोपेत असलेलं संपूर्ण गाव संकटात सापडलं. अनेक निष्पाप जीवांचा यात नाहक बळी गेला व अनेकांचे आयुष्य एका क्षणात बदललं. या घटनेनं व्यथित झालेल्या युवकानं गणेशोत्सवात पीडितांना श्रद्धांजली देण्याचा निर्धार केला. देवेशू मानवेंद्र ठाणेकर असं या युवकाचं नाव आहे. ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात राहणारा देवेशू मानवेंद्र ठाणेकर हा युवक आपल्या वडिलांसोबत लहानपणापासून इर्शाळवाडी येथे जात होता. तेथील सर्वांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते. तेथील सर्व गावकरी आपल्या कुटुंबि्यांप्रमाणे असल्यानं त्यांच्यावर कोसळलेल्या या संकटानं आपण व्यथित झालो व या गणेशोत्सवात समर्पक श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलंय.