ठाणे : शहरातील सर्व सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तू विकून आपल्या आई वडिलांना मदत करणाऱ्या लहान मुलांना आपण नेहमीच पाहतो. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सिग्नल शाळेची सुरुवात झाली. या सिग्नल शाळेच्या दैनंदिन खर्चासाठी आता गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी दानपेट्या ठेवण्याचा निर्धार सिग्नल शाळेच्यावतीनं करण्यात आला आहे.
सिग्नल शाळेतील मुलाचं यश :शहरातील प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर फुलं, लहान मुलांची पुस्तक अशा छोट्या मोठ्या वस्तू विकून आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा उचलणारी लहान मुलं आपण सर्वचजण नेहमी पाहतो. भीक मागणाऱ्या महिलांच्या पाठीवर असलेली लहान मुलं शिक्षणापासून मात्र वंचित राहतात. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प सिग्नल शाळेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. या शाळेत इतर शिक्षणाबरोबरच सुतारकाम, प्लम्बिंग, फिटिंग सारखं वोकेशनल ट्रेनिंग देखील देण्यात येत असून यातील तब्बल सात मुलं इंजिनियर झाली आहेत. शाळेची दोन मुले 'यंग सायंटिस्ट' उपक्रमांतर्गत यंदा 'इसरो' स्पेस एजेन्सीत जाणार आहेत. परंतु अशा या सिग्नल शाळेला दैनंदिन खर्च चालवण्यासाठी आर्थिक मदतीची नेहमीच गरज भासते.