ठाणे Ganesh Festival 2023 :लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी भक्तांकडून झाली असून ठाण्यात जवळपास 1 लाख 46 हजार 250 बाप्पांच्या मूर्तींची विधीवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 45 हजार 198 तर सार्वजनिक मंडळाच्या 1 हजार 52 बाप्पांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या गजरात हातात टाळ, मृदुंग तर ढोल आणि डिजेच्या तालावर ठेका धरत रस्ते दुमदुमणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा सुमारे 6 हजार बाप्पांची ( Ganesh Festival ) शहरी भागांमध्ये वाढ झाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
बाप्पांच्या मूर्तींची होणार विधीवत प्राण प्रतिष्ठापना :ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भाग परिसरातील कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. याच शहरी भागात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तींची विधीवत प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. गणेश उत्सव आणि कोकणवासीयांचं एक अतूट नातं आहे. या उत्सवाला नकळत चाकरमानी हे हमखास कोकणात जातातच. रेल्वे, लालपरीला कितीही गर्दी असली, किंवा खड्डे असलेल्या रस्त्यांवरुन चाकरमानी या उत्सवाला जातातच.
परिवहन विभागामार्फत टोल फ्री पासचं वाटप :यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वे प्रशासनानं मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यातच खासगी गाड्या घेऊन जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागामार्फत टोल फ्री पासचं वाटप केल्यानं कोकणवासीयांनी लवकर कोकण गाठलं आहे. याशिवाय, ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या आयुक्तालयाचा पाच परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण 1 लाख 46 हजार 250 बाप्पांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सार्वजनिक असो वा घरगुती, आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पांचं आगमन झालं आहे. तर काही तासांनी बाप्पांचं आगमन धुमधडाक्यात होणार असल्यानं बच्चे कंपनीपासून आबालवृद्ध ही कधी बाप्पा येतात याच्याकडं डोळे लावून बसल्याचं पाहण्यास मिळत आहे.