ठाणे - महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा जुगाराचा डाव खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहूनच त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्याच कार्यालयातील एका कनिष्ठ अभियत्यांने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यांनतर हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे जुगारी कर्मचाऱ्यांचे बिंग फुटले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, या कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार, मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी द्यावयाची आहे. कामावर असताना कर्मचाऱ्याचे कोणतेही गैरवर्तन गांभीर्यपूर्वक घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणच्या उल्हासनगर उपविभाग-४ अंतर्गत लालचक्की शाखा कार्यालयात कर्तव्यावर असताना कर्मचारी तीन पत्ती आणि रमीचा जुगार खेळत होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच ८ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. त्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडुरंग पवार व महेश नारायण काळसईतकर, विद्युत सहायक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले व मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहायक विनोद तुकाराम बोबले आणि कंत्राटी कामगार सुनील पांचाळ या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.