ठाणे - पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांवर राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे. घोडबंदर रस्ता येथील होरायझन प्राईम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. यामुळे कोरोनाबाधित गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाबाधितांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधेला सुरुवात
घोडबंदर रोड येथील होरायझन प्राईम रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जातील.
शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विशेष घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते. याच पार्श्वभूमीवर पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना या रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार मिळावेत यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल प्रयत्नशील होते. त्यानुसार आजपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत कोरोना उपचार दिले जाणार आहेत. ही योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण रुग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. या विषयी अधिक माहितीसाठी 022-68556855 आणि 86575 08101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.